Sunday, 7 October 2018

प्रथा-परंपरा

प्रथा-परंपरा 

निर्मिका दगडा शेंदूर थापून निर्मिला देव
भोळ्या जीवांच्या मनात निर्मिले तू भेव
दुधासाठी कैक बाल अश्वत्थामे ते वंचित
दगडी देवाला दुग्धाभिषेक मोठ्याथाटात
बरी सगुणभक्ती मूर्तीरूप भगवंतही बरा
काय सांगू भगता चालू आहे प्रथा परंपरा

नारळफोडून मधुर पाणी ओति देवामोरीत
गंगाजल म्हणून गटारपाणी घेतात पोटात
गाभार्यात दुधानारळ पाण्याचा कुबट वास
दर्शनरांगेतुन गाभार्यात येता गुदमरतो श्वास
गाढवापुढे गीतापठण कालचा गोंधळ बरा
काय सांगू भगता चालू आहे प्रथा परंपरा

तैल तुपाचे दिवे ओवाळून देवा काजोळती
गोरगरीब हे भाजीत तेलाचा उंदीर मुतविती
ढोलनगारे घंटानाद कानी देव झाला बहिरा
नवस सायास करून रोग होणार काय बरा
देव शाकाहारी अन देवीला नवसाचा बकरा
काय सांगू भगता चालू आहे प्रथा परंपरा

बालपणी गुरव बाळाने देवाची पै उचलली
म्हणती मुका होउन तयाची वाचा बंद झाली
सध्या कोट्यवधी संपत्ती देवा तुझी लुटतात
तरि कोणी मुके झाल्याचे नाहीरे ऐकिवात
देव पण दुर्बला घातकी बळी जातो बकरा
काय सांगू भगता चालू आहे प्रथा परंपरा

कवी-   हेमंत राम  पाटील.B-201 त्रिवेणीसंगम,
         तावडेवाडी, एल.टी.रोड.दहिसर (प ).
         मुंबई.400068.M- 8108419392.

No comments:

Post a Comment