Sunday, 29 October 2017

घिवली

घिवली

मोप झाडे ओथी घनदाट सावली
पाच-पन्नास घरं हारीनं वसलेली
वाडवळ भंडारी घणिखरी मांगेली
एकोप्यानं नांदली नगरी घिवली

हेतीभाती न मासेमारीवर  गुजराण
वीजनिर्मितीपायी उठले गावठण
अणुकेंद्रातभरती जाले कोणकोण
बहुजनांची जाली फक्त वणवण

शीव न रेली कुंपणाने हेत खाल्ले
लखू हुताराने हेत नावी ना केले
जमीन मोबदला भलत्याने लाटला
लखूया लख्मीने वनवास भोगला

पंचक्रोशियानो शाणे व्हारे यापुढे
विकास होता बगा गाव नय रे बुडे
घिवली उठली परि लोकं न हटली
बंदरग्रस्तांनो राहू दे हरितसावली

........पी. हेमंतराम कविवर.

Saturday, 28 October 2017

व्यथा गुरूजनांची

व्यथा गुरुजनांची

इंग्रजी माध्यमाचे खूळ माजले
गुरूजनांचे नशिब फुटले
वरीष्ठ-निवडश्रेणी स्वप्न भंगले
गुरुजी वेठबिगार झाले

मायबोलीतून आजवर जे शिकले
ते काय कोण भणंग झाले?
मग आताच असे काय चुकले
मातृभाषेतून शिक्षण बिघडले

तुम्ही आम्ही जे काय घडले
ते काय इंग्रजांनी घडविले?
मायबोलीतून शिका बापू वदले
शिक्षणसम्राट ते विसरून गेले

धोबीका कुत्ता न घरका न घाटका
कळते तेव्हा जाते ती घटिका
आज अपमानती जे शिक्षका
त्यांनी ओळखला नाही धोका

अरे संस्कार मायबोलीचे थोर
दाई आईची जागा काय घेणार
ही इंग्रजी माध्यमाची पोरींपोरं
होतील भूईला खचितची भार

...........पी. हेमंतराम कविवर.

Monday, 23 October 2017

कमळू न्हावी

कमळू न्हावी

कचकच चाले केसावरून कमळू काकाची कैची
कैक डोस्कीवरुन केसझिपर्या लिलया उडवायची
वडाच्या पारावर बस्तान न्यारीच मजा सलूनची
झटझट झावळी उडवी करामत कमळून्हाव्याची

गावगजालीचा विपुल साठा शैलीदार कथाकथन
करमणूक करी कमळू कैचीने करीत केशवपन
तोंडाचा पट्टा चालवित होई जेष्ठांचा गोटा छान
बाकी हजामती कौशल्याने हवी तशी फँशन

ईतवारी कायम कमळूचे चाले अखंड केशकर्तन
दाढीसफासफ कुणाचे मुंडण जायवळी केशदान
दुपारच्याला हांड्यागोविंद देई कमळूस भोजन
विसावा घटका भरता पारावरती होई पुनरागमन

स्मरतो आजही कमळू हजाम हजामती सम्राट
बाल्यकेशसंस्कार आठवत चालतो सलूनची वाट
कमळूसंगे कारागीरी गेली आता केसंही ना दाट
दाढी काढी घरच्याघरीच वापरून पात जिलेट

.........कविवर हेमंतराम पाटील.

Wednesday, 18 October 2017

बावीस बळी

बावीस बळी

आश्विन शुद्ध नवमीस गेले बळी बावीस
सेंगरासेंगरी एलफिस्टनपुलावर ऊत गर्दीस
अस्तंगत वर्षामोसम बरसला जोराया पाऊस
पुलाश्रित मुसाफिर सेंगरून पं.वि. बावीस

एकमेकां दोष लावित ढाळतील दोन आसू
मुंबापुरी गर्दीत हरवली पुहणार कोण आसू
एलफिस्टनसे प्रभादेवी नाव जरि तुमी केले
लोंढ्यावर लोंढे रामपारी उदंड की लोटले

बुलेट ट्रेन हिरवाबावटा, लोकलस्या गर्दीय काय
मुलभूत सुविधावंचित मुंबैकरा बुलेट गरज काय
गर्दीह्या बळींना पळभर बोलतील जन हाय हाय
येरे माया मागल्या उद्या त्यास गर्दीत तू पण भाय.

.........कविवर हेमंतराम पाटील.२९/९/१७.

बापू बैरा

बापूबैरा

तांबड फुटलं रामपाराला
कोटवाळ बैराबापू उठला
तडक पाटलाहा वाडा गाठला
आल्या आल्या विसारता जाला
पाटला कहा काय तुहा खटला?
तवडा खाटला दे विणाव्याला
शिळपाकं द्या न्याहरीला
भातायी पेज ठेवा दुपारस्याला

बापूबैरा वयाही ऐशी पार केला
गाव कोटवाळी करता जल्म गेला
वयपरत्वे थकुनशान भागभाग भागला
गावकुसाबायेर हयातभर खोपटीत रेला
आता घरोघरी कायबाय करून राहिला
कोणसा दारापुडासा केर काढला
काटाकुटा दगड धोंडा गोटा गोळा केला
अहा सवता कष्टत एकदिही खपला

........पी. हेमंतराम कविवर.

आनंदी दिवाळी

आनंदी दीवाळी

तहोळी रवोळी करंजी कडबोळी
चिवडा लाडू अनारसे शंकरपाळी
आकाशकंदील रंगित ओटी रांगोळी
अही साजरी बालपणी आनंदी दीवाळी

फटाक्यांना फाटा लवंगीतोटी नवाळी
निवडुंगी पणत्यानी साजरी  दीवाळी
गावी जमा  होई  गण-गोत वाडवळी
अही साजरी बालपणी आनंदी दीवाळी

भाताही उडवी देवळागत विराजित खळी
नवान्न गोडी खीर भन्नाट कांडल्या तांदुळी
खाऊन तृप्त ढेकर देती सकल बाळ-बाळी
अही साजरी बालपणी आनंदी दीवाळी

नवते हेवेदावे भांडाभांडी उखाळीपाखाळी
बालकांसे बगिचे फुलवित होता राममाळी
हिवाळी आधिवेशन खुलवी मना दीवाळी
अही साजरी बालपणी आनंदी दीवाळी

..........कविवर हेमंतराम पाटील.१७/१०/१७.

.....

बाबा पाय लागू

बाबा पाय लागू

जो तो बाबा पाय लागू हांगत पाया पडायसा
बाबाहे पाय धराया  भोळसट रांगा लावायसा
मंग पाप शंभरी भरली बाबा गेला बंदिवासा
मुखी राम मनी काम अवतार भोंदू बाबासा

तो ओशो परवडला संभोगसमाधी खुल्लंखुल्ला
त्यानं भुलविल्या देशी-विदेशी मोप मजनु-लैला
आसाराम बुढापप्पू ज्वानीमशाल पेटविता जाला
कामलीलांना ऊत आला आश्रमी अगाध लीला

पाप मेनकेहे विश्वामित्र मोकळा की सर्वकाळा
परि विद्यावान सावित्रीकन्या रोकतिल गंदा साळा
बुद्धी  शाबूत ठेवा  भोंदूंबांसा नको कपाळी टिळा
पाया पडू नका कंठी वाहू नका फुलांस्या माळा

एकास परमात्म्याहे पुत जकले समान रे जगति
गाडगेबाबा अनुसरा जर हवा गुरूश्री करामती
मन प्रसन्न करा मन आपुले गुरू ध्येय पथावरती
घ्या जरा कष्टा व्हा स्वये द्रष्टा अधिपती याधरती

..........कविवर हेमंतराम पाटील.

Thursday, 5 October 2017

लोंढा

✍लोंढा

लोंढ्याने लाविली वाट
मुंबई केली साफ सपाट
अवतरती एका रात्रीत
मुंबय माय बघा कात्रीत

हे कोठुन येती रे लोंढे
जनसंख्या वाढता वाढे
उभारती कुठेही झोपडे
परक्यांचे तांड्यावर तांडे

मतदानावर राजकीय डोळा
म्हणोनिया मुंबईला आवकळा
भाऊगर्दी करून उपरे गोळा
मराठी बांधव बिचारा भोळा

आता आले गळाभर पाणी
बुडणार मुंबई आमुची धरणी
उठ उठ जागा हो मराठा बंधू
एकीने उपर्यां बाडबिस्तरा बांधू

........पी. हेमंतराम कविवर.

Monday, 2 October 2017

वर्णव्यवस्था

वर्ण व्यवस्था प्राचीन भारतीय वर्णव्यवस्थेमागे निश्चितच काही सुव्यवस्था होती.आता राखीव जागाच्या संदर्भात डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी दहा वर्षांची डेडलाईन दिली होती ती विचारपूर्वकच.कारण सवलतीची ढाल या दलीतांना कायमचे पंगू बनवेल हा धोका त्यांनी ओळखला होता.पण मतलबी राजकरण्यांनी हीच ढाल वापरून विविध जातीजमातींना एक दशकाची सात दशके झाली तरि सवलतीच्या नावाखाली स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली आहे. जाती जमाती ही एका भाषिक ,वैचारिक,सांस्कृतिक जीवनप्रणालीतून निर्माण झालेली समाज व्यवस्था होती. प्रत्येक समाजाचे काही मानदंड,रूढी,परंपरा,रितीरिवाज असतात.त्यामुळे समाज मान्यता असलेले विवाह त्या त्या समाजात होत असत आणि विवाहोत्तर दोन परिवार जोडले जाऊन पारिवारीक जीवन निकोप निरामय शांत रहात असे.काही कुरबुरी असतील तर समाजातील ज्येष्ठ लोक सलोखा घडवून आणत.शक्यतो असे प्रसंग फार कमी घडत,कारण एकाच समाजातील परिवारांची ओळख परस्परांशी असते. परंतु आजकाल प्रेमविवाहाचे फँड वाढल्यामुळे भिन्न जाती-जमातीचा संकर होवू लागला. मुलाने स्वतःच्या हिंमतीवर स्वतंत्र घरकुल घेतले असेल व होणारी सहचरी जर कमावती असेल तर आईवडलांना प्रश्न नाही. परंतु कैकदा स्वकमाई पुरेशी नसताना केवळ शारिरीक आकर्षणापोटी प्रेमविवाह करुन आईबापावर पोराच्या संसाराच ओझं पडते तेव्हा त्या माता-पित्यांची काय अवस्था होत असेल हे न सांगताही अनुभवी जाणतील. म्हणून आपण पाहत असतो की मुस्लीम त्यांच्या मोहल्यांतून समुहात राहतात.हिंदू काँलनी,पारशी काँलनी अशी विभागणी दिसून येते. वसईकर सिनोर येशूप्रेमी एकत्र नांदतात.कळंबबीचवासी मांगेले लोक त्यांच्या गावातच रोटीबेटी व्यवहार करतात.डहाणू ,तलासरीतील आदिवासी पाड्या पाड्यातून राहतात.अशी कितितरी उदाहरणे आहेत.हे सर्व समाजघटक आपापले कामधंदे करून उदरनिर्वाह करीत. पण सवलतींचे गाजर दाखवून या बहुजन समाजाला राज्यकर्ते पंगू दुर्बल व ऐदी बनवीत आहेत. आज कष्टाची कामे करायला कोणी तयार नाहीत. मातीत हात घालायला राजी नाहीत. प्रत्येकाला सुरक्षित अशी भरघोस पगाराची कमी मेहनतीची सरकारी नोकरी हवी आहे.पण आता ज्याला त्याला राखीव कुरणात किती काळ चरायला मिळणार. संपली येथली ऊसाची गुर्हाळे संपला येथला अन्नाचा शेर. पण आता दुजा मळा आणि दुजा अन्नाचा शेर आणायचा कोठून? एकतर या सरकारी कर्मचार्यांच्या कामचुकारपणा व लाचखोरीमुळे सामान्य जनतेची सहानुभुती गमावून बसलेला नोकरशाही वर्ग हा राखीव जागांमुळे निर्माण झालेला फार मोठा गुंता आहे. जातीनिहाय दिलेल्या आरक्षणवजा अपात्र खोगीरभरतीला आलेले हे कटुफळ आहे.जवळपास स्वातंत्र्योत्तर सत्तर वर्षे हा खेळ चाललेला आहे.सवलती द्यायच्याच झाल्या तर आर्थिक निकषावर द्या म्हणजे जातीपातीचे राजकारण थांबेल.तसेच गुणवत्तेबाबत कोठेही तडजोड नको.जोवर हे होत नाही तोवर अराजकाचे दुष्टचक्र अविरत फिरत राहणार. उलथून टाक आरक्षण, जातीपातीच्या भींती होऊदे क्रांती पश्चात नांदेल भारती सुखशांती ............हेमंतराम पाटील.(वरोरकर).

वाडवळकट्टा

‌वाडवळ कटृटा- उद्देश, यश न अपेश

       खरं हांगव्या म्हणजे वाडवळ कट्टा यो एक समत्कार हाय अह मला वाटते.त्या वाडवळी नावातस कट्याहा उद्देश उघडपणे स्पष्ट जालायं. वाडवळी बोली नामशेष होते की काय या काळजीन वाडवळीप्रेमी युगूल प्रविणा-राजेंद्र विवंसनेपोटी कट्टा निर्माणकर्ते जाले.त्यात मग बायबोलीप्रेमी बो बो सबासद सहभागी जाले. न भूतो न भविष्यति l अहा वटवृक्षागत पसारा इवल्याशा रोपाया जाला.
           वाडवळी बोलीला संजीवनी देउन ती तगली पायजे,नवीन पीढीत रुजली पायजे,वाडवळीवर्धन होउन जगभर पसरली पायजे.न या कट्ट्यापुरती सीमीत न रेता सर्वमान्य जाली पायजे अहा उदात्त हेतू यामागे हाय तवा यो उद्देश साध्य करव्याहाटी आख्खा सोपाक्ष समाज बाध्य हाय हे ध्यानात घेतल पायजे. असाध्य ते साध्य करता सायास या समर्थाया उक्तीनुसार ध्येय साकार होईल अहा विश्वास मी तरी बाळगुन हाय.
             ध्येय निश्चित जाल्यावर ते साधव्याहाटी कोणकोणत्या पदधतीनं कहे कहे कोणी कोणी परयत्न केले. त्यात आपला पोतेहा वाटा कवडा? यासा विसार पण केला पायजे.त्या दृष्टीने काही जाणकारांनी वेगवेगळ्या स्पर्दा कट्ट्यावर ठेवून मेहनतीन परिक्षणे करुन प्रोत्साहनपर कवतुकव केले. या निमित्तान काही वाडवळी कविता  लिवून  जमेल तही कट्याही सेवा करव्याही संधी मिळाली. अनेकांनी नानापरकारे सहभाग घेउन कट्टा अविरत सालू ठेवून बायबोली तगवून ठेवव्या प्रामाणिक प्रयत्न केल्याह दिहून आलं.
          आता यश न अपेश पाव्या गेल तर अवड्यात एकदम शंभर टक्के अपेक्षा करणे सुकीय ठरेल.तरिपण दीड वहरात कटृयान जी काय मजल गाठली हाय ती ओखाणव्याहरकी हाय.याठिकाणी सबन्ना नामोल्लेख मुद्दामस टाळलायं .काय होते एखाद दुहरं नाव रेवून जाते न कोणस्या तरि जीवाला लागून रेते.पण सातत्यान कट्टा जीवंत रेला अही सदरं थोडक्यात उल्लेख करणं भाग हाय. वाडवळी वार्तापत्र,तून हांगटलं न मीन आयकटलं, मनपसंत भावगीतांहा रोजसा रतीब,तरंगवाणी, बामोपा आप्पांस्या प्रतिक्रिया , वर्षाबायसी टेहळणीवजा हजेरी,विलासआप्पांहे मार्गदर्शन ,हरेशसी जिद्द व कळकळ,आणि वाडवळी शृंगारिक सुहास्य साहित्य,बाकी जकल्या अँडमीनसे वेळोवेळी काय बाय स्फूर्तिदायी लेखन,रोषनाईत शिमकोटे,वाडवळी विनोद व वाद-संवाद,न वेळोवेळी सुकारांना मिळालेल्या तंभ्या,शिवाय रोजस्या गजाली , तहस सणवारं कोणस्या तय का हिजलयं व प्रेमानं खाव्याला या अही आवतणं , वाढदिवस साजरीकरण,मयताला वावलेल्या श्रद्धांजल्या, पूण्यस्मरणे,कोणी केलेल्या सत्कर्मा घेतलेल्या नोंदी वगैरे पावता यो कट्टा म्हणजे एक सालता बोलता मित्र कवा जाला हे  लक्षात पण नय आलं.
           कट्ट्यानेस अहलेली नात्यायी वीण घट्ट जाली.नवी नाती निर्माण जाली. कोण कोणसा कोण हे हळूहळू हमजू लागलं.पण अवड्यानस बायबोलीया उद्धार होणार नय हे पण दूरदर्शी कट्टेकर्त्यांनी ध्यानात घेउन एक उपक्रमशिल निधी जमा केला त्याहाटी आवाहन केल गेल.
दानी लोकांनी त्याला प्रतिसाद दिला व लवकरस इप्सित साधलं जाईल यात तीळमात्र शंका नय.
             आता पुढे काय करता येईल यो पण विसार केला पायजे.आज मितीस जी काय गावोगावी डाय महाणं हात त्यांसाव उपेग करुन घेतला पायजे. वाडवळी बोली संमेलन भरवून अह्या जेष्ठ माहणाया मुलाखती घेउन सित्रिकरण करता येईल.  नाटक ,पोवाडा,गाणी,कथा नृत्य यातून बायबोलीया प्रचार व प्रसार होउ शकेल.
             शासकीय धोरणानुसार बायबोली यादीत वाडवळी बोलीला स्थान मिळालयं ही एक सुखद गोष्ट हाय. पण ही गोष्ट निदान पन्नास वहर आदी जाली अहती ते विद्यापीठात वाडवळी बोलीये शिलेदार झळकलेले पाव्या मिळते आणि साहित्त्यनिलांबरी वाडवळी  ताऱ्यांही  मांदियाळी लखाखून मायबोली बरोबर बायबोलीव गुण्यागोविंदान नांदली अहती.
            परि गाववाले आता शहरवासी जाले
             त्यांसि पोरेबाळे इंग्रजी  दूध प्याले
            आता घरटी एकस अपत्य जल्मले
             वाडवळीबोलीस कठीण दिही आले
अह्या परिस्तिथीत वाडवळ कट्टेधारी सबासदानो आपला बायबोली घेतलेला वसा हे वाडवळ अखिल समाजाहाटी महान कामगीरी हाय. आपला प्रामाणिक प्रयत्न मी पावत आलोय. कुमारदादान शहरी रेवून आपल्या देवकीमातेही वाडवळीबोली तळमळ जपून ही स्पर्दा ठेवली.त्यांसा वाडवळी कळवळा वाडवळ बायबोलीला होन्यादिही दाखाव्याहाटी एक आशास्थान हाय.
     सिनोर पानमाळी ये वसयसे सिनिअर वाडवळ.त्यांनी वाडवळी बायबोली टिकवून ठेवली.आपले वाडवळ कट्टेकर प्रामाणिक परयत्न करतीन ते रात्रिया गर्भात उद्याहा उषाःकाल या कुसुमाग्रजाया उक्तीप्रमाणे घडेल ही कविवराला खात्री हाय.
         तो सोन्याहा दिन सत्वर येवो
        विश्वात वाडवळी विराजित राहो.
जय वाडवळी कविवराही कवन बायबोली.

.......कविवर हेमंतराम पाटील.(दहिसर-मुंबई)
भ्र.ध्व. 9757340310

थापू महाराज

थापू महाराज

थापा मारणे हा मनुष्यस्वभाव आहे हे एकवेळ मान्य केले तरि त्या किती माराव्यात याला काही प्रमाण,तारतम्य नको काय? बरं त्या पचतील अशा तरि आसाव्यात की नको?
        अशा थापाड्या लोकांत थापूगुरू अग्रेसर असतात.त्यांनी मारलेल्या थापा म्हणजे ब्रह्मवाक्य समजून थापूभक्तगण मिरवत असतात.गुरमीत थापूंच्या मारलेल्या थापांना त्याला अटक होताच भक्तांनी फोटोंसहीत जलसमाधी दिली.
           पंचवीस वर्षापूर्वी डहाणू पंचक्रोशीत संपूर्णानंदनामक एक थापू अवतरले होते.त्यांनी काय थापा मारल्या तर म्हणे हिमालयात चाळीस वर्षे एका पायावर उभे राहून त्यांनी तप केले होते.कितीतरी धनीकांनी देऊ केलेल्या मर्सिडिज गाड्या त्यांनी नाकारल्या होत्या. आपल्याकडची महागडी सफरचंद म्हणे त्यांच्या मुलखात झाडाखाली पथारा पडत असे तरि बांडा कुत्रा पण खात नसे. अशा थापू महाराजाच्या नादी लागून वरोरच्या नूतन विद्यामंदीर हायस्कूलचे तत्कालीन हेडमास्तर शेटेसर स्वतः भर रस्त्यावर त्याचे पाय धरत व विद्यार्थीही कित्ता गिरवीत.बाया बापुड्यांना नादी लावून अनर्थ घडण्याआधीच जागृत मच्छीमार तरूणांनी त्याला हाकलून दिले.
‌        थापू महाराज कसे अवतरतात? हा एक प्रश्न बहुजनाना पडतो. उपरोक्त संपूर्णनंदाच्या वरोर मुक्कामी खंडेराव नावाचा तांबारलेल्या डोळ्याचा,
‌विस्कटलेल्या केसाचा एक इसम आला होता.मुंबईला
धारावी भागात केलेल्या गुन्हेगारी कृत्याचा पश्चाताप होऊन पाप विमोचनार्थ तो गुरुच्या शोधात वरोरला पोचला होता.
थापू महाराजांनी त्याला कानमंत्र देऊन शिष्य केले. पुढे संपूर्णानंदाच्या गच्छंतीनंतर हा खंडेराव कुंभोली महाराज म्हणून उदयाला आला व काही कालावधीत त्याचा अस्तही झाला.
           नदीचे मूळ व साधूचे कूळ पाहू नये अशी मान्यता असल्यामुळे भाबडे समस्याग्रस्त लोक अशा फेकू थापू बाबांच्या जाळ्यात अडकतात.अडाणीलोक तर सोडाच पण शिकलेसवरले लोक जेव्हा अशा थापू बुवांच्या दरबारी दाखल होतात तेव्हा खरे आश्चर्य वाटते.हे लोक का स्वतःला प्रश्न करित नाहीत? अरे चार चौघासारखाच संसारी तलाठी भ्रष्टाचारी म्हणून निलंबित होतो काय आणि नंतर अशी काय सिद्धी  प्राप्त करतो की जगतगुरू म्हणून डंका पिटतो व भले भले या तुंदीलतनु थापू महाराजाच्या भजनी लागतात.अरे कोणत्या विद्यापीठाने यांना जगद्गुरू पदवी कशाच्या आधारावर दिली?याची शहानिशा या तथाकथित अनुयायांनी केली असती तर
थापू महाराजांचे प्रस्थ माजले नसते.
            व्यक्तीपूजेचे खूप मोठे गारुड भारतीय मनावर आहे.त्यामुळेच दोन आण्याच्या संमोहन विद्येच्या आधारे थापू महाराज कमकुवत मनाच्या लोकावर अशी मोहिनी घालतात. ऐकीव खोट्या थापा खर्या म्हणून बोलबाला करून थापू बुवांचे बैठकीचे पहिले मानकरी खोटा प्रचार करतात व गणसंख्या वाढत जाते.अशाप्रकारे थापू महाराजांचा महिमा वधारतो.मठ स्थापन होतात व फुकटच्या थापा विकल्या जातात.महाराजांची दुकाने जोरात चालतात.
                कोल्हापूरमध्ये राजकारणी लोकांना गंडे बांधणारा एक थापू महाराज प्रसिद्ध  आहे.राजकारण्यांचे अचूक भविष्य वर्तवणारा अशी ख्याती आहे म्हणे या थापूची.त्यामुळे निवडणुकीच्या समयास या थापू महाराजाचे उंबरठे झिजवताना माहीर राजकीय नेते आढळतात.तसे राजकारणी व बाबाबुवांचे आर्थिक साटेलोटे असतात हे आजकालचे शेंबडे पोरही जाणते.
देवदानवा नरे निर्मिले पण आजच्या ढोंगीसोंगाड्यांनी स्वयेचि स्वघोषित संत वदविले.गोलमोल थापा मारून
थापू महाराज बायांना वश करतात.वशिकरण विद्या त्यांनी चांगली अवगत केलेली असते.या वशिकरण मोहजालात फसलेल्या स्रियांना थापू महाराज गंडा बांधून पार गंडवतात.अतएव सावधान सर्वथा.
           थापा मारून घडतो थापू महाराज जगताचा
           विचारी मना संग नको बा अशा भामट्याचा
.
.       हेमंतराम  पाटील. (वरोरकर)
मो.- 9757340310.
B-201, त्रिवेणीसंगम, तावडे संकुल,
एल.टी.रोड.,दहिसर(प.).मुंबई 400068.

ज्येष्ठ नागरीक

ज्येष्ठ नागरीक दिन

संसारी हात ज्येष्ठ नागरीक बो थोर
भगुन सुरळीत साललायं यो संसार
सुरक्षित हात बालक लेकी नि पालक
आदरयुक्त हाय ज्येष्ठांया प्रेमळधाक

अव्हेरू नकारे त्यांना द्या जरासा मान
जोजवून केले तुमा त्यांनी लानाचे सान
बोलताना त्यांच्याशी ठेवा जरासे भान
त्यांनी खाऊन खस्ता दिले तुमा स्थान

नको  पैसाअडका पायजेत मायाळू बोल
द्या थोडासा वेळ त्यांना होऊ नका अबोल
पचविले हाय त्यांनी नीलकंठी जहर जहाल
परि तुमास केला मिठा अमृतकलश बहाल

मान्य तुमी हात जवान भावविश्व तुमसंआगळं
भगुन कारे ठेवायासे वृद्धाश्रमी तयांना वेगळं
तुमस्या आयुष्याहा हिशेब कधी ना मांडला
सुकले हेच की बहव्याहा पाटही त्यांनी दिला.

..........पी. हेमंतराम कविवर.१/१०/१७.
समग्र ज्येष्ठांना समर्पित.

वाँइसराय

वाँइसराय  वारसावर भरोसा नाय

वाँइसराय विहरला काय तू इंडिया
दारुयं व्यसन लावून गेलास गोर्या
वरोरी समिंदर तीरी लोळलास काय
हातभट्टी पयलीधार झोकलीस काय

सोर ते सोर वर शिरजोर काय
हाय हाय बाय बाय करतोस काय
लेंग्यावीण लुंगीवीण घुमलास काय
खाजनाला कुल्ला दावलास काय

बापूहा सोटा तुया पाठीवर पडला नय
भगुन तू साळसुदपणे हुटलास काय
बेंडल्या तू हुटला पण वारस अडकलय
तुला टोणपे हाणलेले गुमान खातोय भाय

वाँइसराय तुही गय नय न खर नय काय
परत येऊन दाखव तुही व्यायली जर माय
आंब्याही डांगळ तू तवा तोडलीस काय
लंडनला रोपली न शिवांबून हिपली काय

तुये वारस  तुयावाणीस नासक्या दुधाही साय
हात त्यांस्या मायला हजामती करतात काय?
वाँइसराय तुह्या वारसावर आता भरोसा नाय
कारण तुह्यापापाये धनी, लागलय त्यांना हाय

.......पी. हेमंतराम कविवर.