Monday, 23 October 2017

कमळू न्हावी

कमळू न्हावी

कचकच चाले केसावरून कमळू काकाची कैची
कैक डोस्कीवरुन केसझिपर्या लिलया उडवायची
वडाच्या पारावर बस्तान न्यारीच मजा सलूनची
झटझट झावळी उडवी करामत कमळून्हाव्याची

गावगजालीचा विपुल साठा शैलीदार कथाकथन
करमणूक करी कमळू कैचीने करीत केशवपन
तोंडाचा पट्टा चालवित होई जेष्ठांचा गोटा छान
बाकी हजामती कौशल्याने हवी तशी फँशन

ईतवारी कायम कमळूचे चाले अखंड केशकर्तन
दाढीसफासफ कुणाचे मुंडण जायवळी केशदान
दुपारच्याला हांड्यागोविंद देई कमळूस भोजन
विसावा घटका भरता पारावरती होई पुनरागमन

स्मरतो आजही कमळू हजाम हजामती सम्राट
बाल्यकेशसंस्कार आठवत चालतो सलूनची वाट
कमळूसंगे कारागीरी गेली आता केसंही ना दाट
दाढी काढी घरच्याघरीच वापरून पात जिलेट

.........कविवर हेमंतराम पाटील.

No comments:

Post a Comment