वाडवळ कटृटा- उद्देश, यश न अपेश
खरं हांगव्या म्हणजे वाडवळ कट्टा यो एक समत्कार हाय अह मला वाटते.त्या वाडवळी नावातस कट्याहा उद्देश उघडपणे स्पष्ट जालायं. वाडवळी बोली नामशेष होते की काय या काळजीन वाडवळीप्रेमी युगूल प्रविणा-राजेंद्र विवंसनेपोटी कट्टा निर्माणकर्ते जाले.त्यात मग बायबोलीप्रेमी बो बो सबासद सहभागी जाले. न भूतो न भविष्यति l अहा वटवृक्षागत पसारा इवल्याशा रोपाया जाला.
वाडवळी बोलीला संजीवनी देउन ती तगली पायजे,नवीन पीढीत रुजली पायजे,वाडवळीवर्धन होउन जगभर पसरली पायजे.न या कट्ट्यापुरती सीमीत न रेता सर्वमान्य जाली पायजे अहा उदात्त हेतू यामागे हाय तवा यो उद्देश साध्य करव्याहाटी आख्खा सोपाक्ष समाज बाध्य हाय हे ध्यानात घेतल पायजे. असाध्य ते साध्य करता सायास या समर्थाया उक्तीनुसार ध्येय साकार होईल अहा विश्वास मी तरी बाळगुन हाय.
ध्येय निश्चित जाल्यावर ते साधव्याहाटी कोणकोणत्या पदधतीनं कहे कहे कोणी कोणी परयत्न केले. त्यात आपला पोतेहा वाटा कवडा? यासा विसार पण केला पायजे.त्या दृष्टीने काही जाणकारांनी वेगवेगळ्या स्पर्दा कट्ट्यावर ठेवून मेहनतीन परिक्षणे करुन प्रोत्साहनपर कवतुकव केले. या निमित्तान काही वाडवळी कविता लिवून जमेल तही कट्याही सेवा करव्याही संधी मिळाली. अनेकांनी नानापरकारे सहभाग घेउन कट्टा अविरत सालू ठेवून बायबोली तगवून ठेवव्या प्रामाणिक प्रयत्न केल्याह दिहून आलं.
आता यश न अपेश पाव्या गेल तर अवड्यात एकदम शंभर टक्के अपेक्षा करणे सुकीय ठरेल.तरिपण दीड वहरात कटृयान जी काय मजल गाठली हाय ती ओखाणव्याहरकी हाय.याठिकाणी सबन्ना नामोल्लेख मुद्दामस टाळलायं .काय होते एखाद दुहरं नाव रेवून जाते न कोणस्या तरि जीवाला लागून रेते.पण सातत्यान कट्टा जीवंत रेला अही सदरं थोडक्यात उल्लेख करणं भाग हाय. वाडवळी वार्तापत्र,तून हांगटलं न मीन आयकटलं, मनपसंत भावगीतांहा रोजसा रतीब,तरंगवाणी, बामोपा आप्पांस्या प्रतिक्रिया , वर्षाबायसी टेहळणीवजा हजेरी,विलासआप्पांहे मार्गदर्शन ,हरेशसी जिद्द व कळकळ,आणि वाडवळी शृंगारिक सुहास्य साहित्य,बाकी जकल्या अँडमीनसे वेळोवेळी काय बाय स्फूर्तिदायी लेखन,रोषनाईत शिमकोटे,वाडवळी विनोद व वाद-संवाद,न वेळोवेळी सुकारांना मिळालेल्या तंभ्या,शिवाय रोजस्या गजाली , तहस सणवारं कोणस्या तय का हिजलयं व प्रेमानं खाव्याला या अही आवतणं , वाढदिवस साजरीकरण,मयताला वावलेल्या श्रद्धांजल्या, पूण्यस्मरणे,कोणी केलेल्या सत्कर्मा घेतलेल्या नोंदी वगैरे पावता यो कट्टा म्हणजे एक सालता बोलता मित्र कवा जाला हे लक्षात पण नय आलं.
कट्ट्यानेस अहलेली नात्यायी वीण घट्ट जाली.नवी नाती निर्माण जाली. कोण कोणसा कोण हे हळूहळू हमजू लागलं.पण अवड्यानस बायबोलीया उद्धार होणार नय हे पण दूरदर्शी कट्टेकर्त्यांनी ध्यानात घेउन एक उपक्रमशिल निधी जमा केला त्याहाटी आवाहन केल गेल.
दानी लोकांनी त्याला प्रतिसाद दिला व लवकरस इप्सित साधलं जाईल यात तीळमात्र शंका नय.
आता पुढे काय करता येईल यो पण विसार केला पायजे.आज मितीस जी काय गावोगावी डाय महाणं हात त्यांसाव उपेग करुन घेतला पायजे. वाडवळी बोली संमेलन भरवून अह्या जेष्ठ माहणाया मुलाखती घेउन सित्रिकरण करता येईल. नाटक ,पोवाडा,गाणी,कथा नृत्य यातून बायबोलीया प्रचार व प्रसार होउ शकेल.
शासकीय धोरणानुसार बायबोली यादीत वाडवळी बोलीला स्थान मिळालयं ही एक सुखद गोष्ट हाय. पण ही गोष्ट निदान पन्नास वहर आदी जाली अहती ते विद्यापीठात वाडवळी बोलीये शिलेदार झळकलेले पाव्या मिळते आणि साहित्त्यनिलांबरी वाडवळी ताऱ्यांही मांदियाळी लखाखून मायबोली बरोबर बायबोलीव गुण्यागोविंदान नांदली अहती.
परि गाववाले आता शहरवासी जाले
त्यांसि पोरेबाळे इंग्रजी दूध प्याले
आता घरटी एकस अपत्य जल्मले
वाडवळीबोलीस कठीण दिही आले
अह्या परिस्तिथीत वाडवळ कट्टेधारी सबासदानो आपला बायबोली घेतलेला वसा हे वाडवळ अखिल समाजाहाटी महान कामगीरी हाय. आपला प्रामाणिक प्रयत्न मी पावत आलोय. कुमारदादान शहरी रेवून आपल्या देवकीमातेही वाडवळीबोली तळमळ जपून ही स्पर्दा ठेवली.त्यांसा वाडवळी कळवळा वाडवळ बायबोलीला होन्यादिही दाखाव्याहाटी एक आशास्थान हाय.
सिनोर पानमाळी ये वसयसे सिनिअर वाडवळ.त्यांनी वाडवळी बायबोली टिकवून ठेवली.आपले वाडवळ कट्टेकर प्रामाणिक परयत्न करतीन ते रात्रिया गर्भात उद्याहा उषाःकाल या कुसुमाग्रजाया उक्तीप्रमाणे घडेल ही कविवराला खात्री हाय.
तो सोन्याहा दिन सत्वर येवो
विश्वात वाडवळी विराजित राहो.
जय वाडवळी कविवराही कवन बायबोली.
.......कविवर हेमंतराम पाटील.(दहिसर-मुंबई)
भ्र.ध्व. 9757340310
No comments:
Post a Comment